शिवचरित्रमाला भाग ११६
युक्तीने कार्य होतसे.
जीवनातील कोणतीही गोष्ट करताना शिवाजी महाराज असा
विचार करत असत की , या गोष्टीचा स्वराज्यावर कोणचा परिणाम होईल ? निदान
वाईट परिणाम तर होणार नाही ना ? मग ती गोष्ट राजकीय , धार्मिक , आर्थिक
किंवा अगदी कौटुंबिकही असो. महाराजांची स्वत:ची एकूण आठ लग्ने झाली. यातील
काही लग्ने ही याच विचाराने साजरी झाली की , या विवाहामुळे स्वराज्याच्या
सार्मथ्यात काही उपयोगाचे राजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का ?
नाईक-निंबाळकर , राजे महाडिक , राजे जाधवराव , गायकवाड , इंगळे , मोहिते
इत्यादी घराण्यातील मुलींशी महाराजांचे विवाह झाले. ही सर्वच घराणी फार
मोठ्या मानाची आणि राजकीय महत्त्वाची होती. ही सर्वच घराणी कोणा ना कोणातरी
बादशाहाच्या पदरी सरदारी करणारी होती. त्यामुळे या विवाहसंबंधामुळे ही
घराणी केवळ भोसले राजांच्याच नात्यात गुंफिली गेली. स्वराज्याचे हे सर्व
सासरे जबरदस्त लष्करी सरदार बनले. नाती गोती जोडतानाही जिजाऊसाहेबांनी आणि
शिवाजीराजांनी स्वराज्याच्या हिताचा विचार केला. नवीन पिढीतही महाराजांनी
हेच सूत्र कायम ठेवले. कोकणातील शिकेर्राजे , सुवेर्राजे , विचारेराजे या
घराण्यांचाही महाराजांनी असाच विचार केला. यावेळी कोकणात डेरवण , गोंडमळा
आणि कुटरे या भागात (तालुका चिपळूण) शिकेर्राजांचं घराणं फारच मातब्बर
होतं. मंडळी शूर होती. खानदानी वजनदार होती. पण शिकेर्राजे आदिलशाह
बादशाहाच्या पदरी कदीम इज्जतआसार सरदार होते. दाभोळचे वतन वा जहागिरी
बादशाहानं शिर्क्यांना बहाल केलेली होती. शिर्क्यांच्यासारखं मातब्बर घराणं
स्वराज्याच्या कामात सामील झालं पाहिजे हा विचार महाराजांच्या मनांत सतत
वावरत होता. अन् एक दिवस महाराजांनी आपल्या थोरामोठ्या अधिकाऱ्यांच्या
मार्फत हा आपला विचार लग्नसंबंध घडवून आणण्याच्या निमित्ताने बोलून दाखवला.
त्यावेळी शिकेर् घराण्यातील प्रमुख आसामी होती पिलाजीराजे शिकेर्.
पिलाजीराजांना गणोजीराजे या नावाचा मुलगा आणि जिऊबाई (उर्फ येसूबाई) ही
मुलगी होती. महाराजांच्या मनांत साटंलोटंच करावं असं आलं. म्हणजे आपली
मुलगी राजकँुवर उर्फ नानीसाहेब ही शिर्क्यांच्या गणोजीराजांना द्यावी आणि
त्यांची मुलगी येसूबाई ही आपल्या संभाजीराजांना करून घ्यावी असं हे
साटंलोटं करावं हा विचार महाराजांनी केला. नातेही जुळेल आणि राजकीय संबंधही
जुळून येऊन कदाचित शिकेर्राजे हे आपल्या साऱ्या परिवारानिशी स्वराज्याच्या
कामांत सामील होतील. ही अपेक्षा त्यांच्या मनी आली. पण यात एक फार मोठा
अवघड असा पेच होता. तो म्हणजे शिर्क्यांच्या जहागिरी वतनाचा. ही त्यांची
जहागीर कोकणातच होती. ती आदिलशाहीकडून त्यांना पिढीजात होती. शिकेर्राजे
आणि भोसलेराजे यांचे नाते जमण्यात फारसा अवघड पेच येणार नाही. पण
शिकेर्राजे स्वराज्यात येतील की नाही ही मात्र शंका होती. अन् महाराजांनी
लग्नाची बोलणी शिर्क्यांशी सुरू केली. नात्याने शिकेर् भोसले सोयरे झाले.
लग्ने थाटात झाली. महाराजांची लेक शिर्क्यांची सून झाली. त्यांची लेक
येसूबाई महाराजांची सून झाली. चार दिवस उलटले. अन् महाराजांनी आपल्या
मनीचे गूज पिलाजीराजे शिकेर् यांना बोलून दाखवले , की शिकेर् मंडळींनी
स्वराज्याच्या सेवेत यावे. सवय लागलेली बादशाही सेवा सोडून इकडे येणे अवघडच
होते. पण त्यालाही पिलाजीराजे शिकेर् यांनी मान्यता दिली. आनंदच कलमी
आंब्यासारखा मोहरला. पण यात सर्वात मोठा अवघड भाग होता. तो म्हणजे
स्वराज्यात विलीन व्हावे लागणार होते. शिकेर् जहागिरी स्वराज्यात पूर्णपणे
देऊन टाकावी लागणार होती. आणि शिकेर् हे स्वराज्याचे , त्यांच्या
योग्यतेप्रमाणेच पण स्वराज्याचे पगारी नोकर बनणार होते. असे हे अवघड दुखणे न
कण्हता सोसणे शिर्क्यांना जड जाणार होते. पण महाराजांच्या प्रभावामुळे
म्हणा की शिर्क्यांच्या मनांत उदात्त भाव निर्माण झाल्यामुळे म्हणा ,
पिलाजीराजे शिकेर् यांनी आपले दाभोळचे आणि इतर काही असलेले बादशाही वतन
स्वराज्यात विलीन करण्यास मान्यता दिली. खरोखर अतिशय आनंदाची पण तेवढीच
थक्क करणारी गोष्ट होती. सर्वात सुखावले स्वत: शिवाजीमहाराज कारण
स्वराज्यात कुणालाही जहागिरदारी वा सरंजामी वतने न देण्याचा अत्युत्कृष्ट
रिवाज , अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांनीच चालू ठेवला होता.
शिर्क्यांचे शाही वतनदारी जीवनच बदलले. ते स्वराज्याचे शिलेदार आणि पगारी
सरदार झाले. चार दिवस उलटले. लग्नात अगदी छोटी छोटी असलेली मुले हळूहळू
मोठी होऊ लागली. अन् पिलाजीराजे शिर्क्यांच्या मनात नकळत मोहाचं मोहोळ जमा
होऊ लागलं. त्यांना आपल्या बादशाही वतनाची घडीघडी आठवण होऊ लागली. अन् एक
दिवस तर त्यांना वाटू लागलं की , आपले स्वराज्यात विलीन झालेले दाभोळचे वतन
आपलं आपल्याला हवंच. इतर कोणाला महाराज वतने देत नसतील , तरी व्याही या
नात्यानं महाराजांनी आपलं पूर्वापार वतन आपल्याला द्यावंच. हा विचार
स्वराज्याच्या दृष्टीने घातकी होता. नव्हे , विषारी होता. कारण एकदा ही
स्वराज्याची सरंजामशाहीमुळे तबीयत बिघडली , तर स्वराज्याला क्षयासारखा रोग
जडेल. अन् एक दिवस हे स्वराज्य स्वार्थात बुजबुजून कोणाच्यातरी म्हणजे
वतनदारी देणाऱ्या कोणा परक्याच्याही गुलामगिरीत पडेल. अगदी शेवटी इंग्रज
आले तेव्हा पेशवाईचे असेच झाले ना ? शिंदे , होळकर , गायकवाड , नागपूरकर
भोसले , पटवर्धन आणि असंख्य लहानमोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी
स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना! हे ते विष होते. वतनदार हे तो
राज्याचे दायाद. म्हणजे भाऊबंद. ते भाऊबंदकीच करणार. अन् स्वराज्य मात्र
मरणार. महाराजांनी उगवतीपासून मावळतीपर्यंत सारा विचार तोरणा काबीज
केल्यापासूनच निश्चित ठरवलेला होता , की कोणास वतन , सरंजाम देणे नाही.
अन् आता तर शिकेर् राजांच्या मनांत हाच विचार आला आणि पिलाजीराजे शिकेर्
यांनी महाराजांकडे पत्र पाठवून ‘ आमचे दाभोळचे सरंजामी वतन आमचे आम्हांस
मिळावे ‘ अशी उघडउघड मागणीच केली आता! व्याह्यांच्या या मागणीने महारज
हादरले. धर्मसंकटच उभे राहिले. व्याह्यांना वतन द्यावे , तर आपल्या सर्व
सरदारांवर त्याचा काय परिणाम होईल ? न द्यावे तर शिकेर् नाराज होतील
रागावतील. संतापतील. अपमान मानतील आणि पुन्हा बादशाहाला जाऊन सामील होतील.
कुणी सांगावं काय होईल ते! महाराज चिंतेत पडले. अन् त्यांच्या मनांत एक
धूर्त सोंगटी अडीच घरं तिरपी सरकली. त्यांनी पिलाजीराजांना पत्र लिहून
कळवले. पत्र छान लिहिले. पत्रांत म्हटलं , ‘ दाभोळचे तुमचे अमानत ( म्हणजे
स्वराज्यात विलीन झालेले) झालेले वतन तुम्हांस परत द्यावे ऐसे आमचे ठरले
आहे. आमची लेक तुम्हां घरी दिली. तिला पुत्र झाल्यावरी त्याचे नावाने हे
वतन द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. म्हणजे त्या लेकीला ( तिचे नांव राजकुँवर
नानीसाहेब) पुढे मोठी झाल्यावर जेव्हा केव्हा पुत्र होईल , तेव्हा पाहता
येईल! शिकेर्राजेही जरा नाराजले. पण पुढे नक्की आपल्याला दाभोळ परत मिळणार
या समाधानात सुखावले. लौकर नातू जन्माला येवो , हीच अपेक्षा राजांच्या
मनांत दरवळत राहिली. पण महाराजांनी मात्र कुणालाही सरंजाम न देण्याचा आपला
राज्यकल्याणकारी हेतू ढळू दिला नाही.
No comments:
Post a Comment