स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या स्नुषा व स्वराज्याचे
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या छत्रपती
राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म
१६७५ साली तळबीड येथे झाला. (जर तुम्ही
कुठेही ताराबाईंची जन्मदिनांक १४ ऐप्रिल पाहत असाल तर ती अत्यंत चुकीची आहे.) ताराबाईंचे
लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी
रायगडास वेढा घातला असता महाराणी येसूबाईंच्या सांगण्यावरून त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून
निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य
यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती
घेतली.त्यांचा बराच काळ खेळणा किल्ला(विशाळगड) येथे गेला. राजाराम महाराजांना समज
देण्यासाठी सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना
शिवाजी हा पुत्र झाला.
सन १७०० साली जिंजी मोगलांच्या
ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व
इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती झुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण झुल्फिखारखानने
लाच घेऊन सर्वांची मुक्तता केली. यावेळी छत्रपतीं व त्यांच्या कुटुंब कबिल्यास सोडविण्यासाठी गणोजी शिर्के व राणोजी
शिर्के मंडळीनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कडून दाभोळच वतन नावावर करून घेतलं.
हे वतन शिवरायांच्यापासून येथील चौथाईचे
हक्क चिटणीसांकडे होते पण खंडो बल्लाळनी स्वामी निष्ठेपायी विचार केला नाही. ३
मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम राजे यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर
मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये संताजी-
धनाजी बाळाजी
विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी
आंग्रे,
राणोजी घोरपडे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी
अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी
बनविली.
राजाराम महाराजांच्या
निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण
प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका
घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या
सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास
वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले.
दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक
परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून
आर्थिक बळ वाढवले. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात
शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची
तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.या काळात गनिमी काव्याला वेगळीच कलाटणी देऊन
माघार घेत घेत शत्रूकडून खंडणी वसूल करून राज्यकारभार बळकट करण्याच धोरण अवलंबल.
शक्य तितका काळ किल्ला लढवायचा, मनुष्यबळाची
नुकसानी टाळायची, किल्ल्यावरची शिबंदी, दिलेली रसद
संपत आली की वाटाघाटीच्या बोलण्यात शत्रुला
गुंतवुन आणखी वेळ काढायचा अन् किल्ला शत्रुला देताना भरभक्कम रक्कम उकळूनच
द्यायचा हेच धोरण ताराबाईंनी ठेवले. कारण पुढे शत्रुची पाठ वळली की हे किल्ले
पुन्हा हस्तगत करुच हा विश्वास त्यांना होता. अन् तो सार्थ ठरलादेखील.
घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान,
तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.
तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.
वास्तविक सन १७००
साली छत्रपती
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती
शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि
नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला
गादीवर बसवले, आणि गिरजोजी यादव, रामचंद्रपंत अमात्य शंकराजी
नारायण , खंडो बल्लाळ, संताजी-धनाजी यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार
पाहण्यास सुरुवात केली. राजारामां नतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवून ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी
आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली.
औरंगजेबाच्या
मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात
दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी
यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू
झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी
विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी
शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी
दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बाळाजी
विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली. शाहूच्या
पक्षात गेलेले बाळाजी
विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन
जाधव, कान्होजी
आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला.
ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूंनी साताऱ्याला गादीची
स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी
गादी स्थापन केली.
त्यानंतर
वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि
मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
सन १७१४ साली राजमहालात
झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून
छत्रपती राजारामराजेंच्या तिसऱ्या राणी राजसबाई यांनी बंड करून स्वतःच्या मुलाला राजे संभाजी यांना छत्रपती
म्हणून नेमले. ताराबाई व त्यांचा पुत्र शिवाजीराजे यांना कैदेत टाकले.त्यातच
ताराराणींचा पुत्र शिवाजीराजे यांचे निधन झाले.पुढे शाहूच्या मध्यस्थीने
ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या.तेथेही
त्या नजर कैदेतच असल्यासारखे होते. जवळ जवळ ३५ वर्षे त्यांचे जीवन कैदेत
असल्यासारखेच होते. छत्रपती शाहूंना पुत्र नसल्यामुळे ताराबाईंनी नातू रामराजा
यांस सातारा गादीस दत्तक दिले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी वयाच्या ८६ व्या
वर्षी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर
झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे
कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.
मराठी राज्याच्या अडचणीच्या
काळात कोणी कर्तबगार पुरुष घरात नसताना आणि औरंगजेबसारखा बलाढ्य शत्रू आपल्याच
राज्यात आलेला असताना एका स्त्रीने राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. राज्याला,गादीला आणि
समाजाला खंबीर नेतृत्व दिले. सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. मराठ्यांच्या
इतिहासातील स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात
मुघल सत्तेच्या विरुद्ध लढा उभारुन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम
महाराणी ताराबाई यांनी केले. त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्त्व
निर्विवादपणे सिद्ध केले. करवीर राज्याची, कोल्हापूरच्या
राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार
राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती
संभाजीमहाराज यांच्यामागे त्यानी कणखरपणे मराठी राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती
संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून
सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे
पान आहे.
कवी
गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
No comments:
Post a Comment