शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी
तत्पर.
धार्मिक बाबतीत
शिवाजीमहाराजांचे मन अतिशय उदार किंबहुना श्रद्धावंत होते. कोणत्याही धर्माच्या
वा सांप्रदायाच्या प्रार्थनास्थळांचा ,
धर्मग्रंथांचा , रीतरिवाजांचा वा
धर्मोपदेशक गुरुजनांचा त्यांनी सुलतानांप्रमाणे अवमान वा छळणूक कधीही केली
नाही. त्या सर्वांचा त्यांनी आदरच केला. महाराज जेवढ्या आदराने आपल्या
कुलगुरुंशी बोलत , वागत तेवढ्यात आदराने ख्रिश्चन ,
मिशनरी ,
धमोर्पदेशकांशीही वागत. मुसलमान
साधुसंतांशीही त्यांचे वागणे अतिशय आदराचे
असे. केळशी (जि. रत्नागिरी) येथील बाबा
याकूत या संत अवलियांशी महाराज
मराठी संतांइतकेच भक्तीभावाने वागत.
काही ठिकाणच्या मशिदींना व्यवस्थेसाठी
महाराजांनी अनुदाने दिलेली आहेत. अनेक
किल्ल्यांवर मशिदी होत्या. त्यांचीही
आस्था आणि व्यवस्था उत्तम ठेवली जात
असे. चाँदरातीला चंददर्शन घडताच
किल्ल्यांवरून तोफ उडत असे. बखरींतही
महाराजांनी मुस्लिम सैनिकांबद्दल
वेगळेपणा म्हणजेच भेदभाव दाखवल्याची
एकही नोंद मिळत नाही.
पण महाराज धर्मभोळे , गाफील , ढिसाळ किंवा
अंधश्रद्ध अजिबात नव्हते.
पोर्तुगीज जेस्युईट मिशनरी दक्षिण
रत्नागिरी भागांत अनेकदा सशस्त्रब्रससैन्य घुसखोरी करीत. तेथील मराठी बायकापोरांना
गुलाम करून पळवून नेत. बाटवीत आणि स्त्रियांची जबरदस्तीने वाटणी करीत. गोवा इन्क्वीझिशनसारखे जुलमी राक्षसी प्रकार सतत चालू ठेवीत. ऑईल
टॉर्चर , वॉटरटॉर्चर , फायरटॉर्चर यासारखे भयानक प्रकार या इन्क्वीझिशनमार्फत गोमांतकात चालू होते. हे सर्व प्रकार बंद पाडण्यासाठी संपूर्ण
गोमांतके पोर्तुगीजांकडून जिंकून स्वराज्यात घेणे हाच एकमेव उपाय होता.
महाराजांनी त्याकरिता प्रयत्न केले. थोड्या भागांत , थोड्या प्रमाणात
त्यांना यशही आले. पण गोवा मुक्त होऊ शकला नाही. पण महाराजांनी एकदा
बारदेशच्या स्वारीला वेळेला , मराठी बायकापोरांना आणि पुरुषांना जबरदस्तीनं गुलाम करणाऱ्या जेस्युईटांच्या सैन्यावर स्वत: जातीनिशी , योजनापूर्वक
प्रतिहल्ला चढवला आणि त्यांचा पूर्ण बिमोड केला. त्यातील काही मिशनऱ्यांचे
त्यांनी हात कलम केले. तेथे दयामाया केली नाही की , हे धमोर्देशक आहेत , संत आहेत हेही पाहिले नाही. याच्या नोंदी पोर्तुगीज दप्तरांत अधिकृत आहेत.
डॉ. पांडुरंग पिर्सुलेर्कर आणि डॉ. ए. के. प्रियोळकर यांनी आपल्या गंथात हे
नमूद केले आहे. पण महाराजांनी मिशनऱ्यांच्याच चांगल्या आणि लोकोपयोगी
कार्याला पाठिंबाच दिला आहे. ६ जाने १६६४ या दिवशी फादर अॅम्ब्रॉस हा
कम्युसिन ख्रिश्चन मिशनचा धमोर्पदेशक महाराजांना सुरत येथे स्वत:
भेटावयास आला आणि त्याने ‘ आपण कृपा करून आमच्या प्रार्थनास्थळास , धर्ममठास आणि आमच्या हॉस्पिटलमधील गोरगरिब ,
दु:खी रुग्णांस त्रास देऊ नका. ‘ अशी विनंती केली. तेव्हा महाराजांनी काढलेले उद्गार (आणि त्याप्रमाणे आचरणही)
फार लक्षात घेण्यासारखे आहेत. ते त्या फादरला म्हणाले , ‘ तुम्ही लोक गोरगरिबांच्याकरिता किती चांगले काम करता हे मला माहीत आहे.
तुमच्या प्रार्थनास्थळांना आणि काम करणाऱ्या लोकांना (ख्रिश्चन
मिशनऱ्यांना) आमच्याकडून अजिबात धक्का लागणार नाही. (आपणांस संरक्षणच दिले
जाईल.) ‘
महाराज सर्वच धर्मातील संत
सत्पुरुषांचे आशीर्वाद घेत होते. सर्वांच्याबद्दल अपार आदर ठेवीत होते. पण
राजकारणात वा राज्यकारभारात त्यांचा सल्ला सहभाग घेत नव्हते. कोणताही
साधुसंत त्यांचा राजकीय सल्लागार किंवा गुरू नव्हता. कोणत्याही साधुसंताने
राज्यकारभारास किंवा राजकारणात हस्तक्षेप किंवा सल्लामसलत केल्याची
एकही अधिकृत नोंद अद्याप मिळालेली नाही किंवा एकही अधिकृत कागदपत्र
उपलब्ध झालेले नाही.
राजकारणांत अजिबात भाग घेतला
नाही म्हणून कोणाही शिवकालीन संत सत्पुरुषाचे थोरपण कमी ठरत नाही. या सर्व
संतांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक लोकजागृती
, खऱ्या आणि डोळस श्रद्धेचा उपदेश , निर्व्यसनी आणि सदाचारी समाज निर्माण करण्याकरता त्यांनी आजन्म केलेले कार्य
त्यांचे अत्यंत शुद्ध आणि साधे वर्तन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कार्य
म्हणजे पारतंत्र्याच्याही बादशाही काळात मराठी भाषेची त्यांनी केलेली
अलौकिक सेवा हे होय.
वा. सी. बेंदे या थोर इतिहासपंडितांच्या संशोधनाने मराठी इतिहासाला एक गोष्ट ज्ञात
झाली की , श्रीगोंद्याचे शेख महम्मदबाबा हे मालोजीराजे भोसले , म्हणजेच शिवाजी महाराजांचे आजोबा यांचे धामिर्क परम श्रद्धास्थान होते.
मालोजीराजांची श्रद्धाभक्ती अहमदनगरच्या शाहशरीफ या थोर सत्पुरुषांवरही होती.
त्यांच्याच आशीर्वादाने मालोजीराजांना पुत्र झाले , अशी त्यांची श्रद्धा
होती. त्यांनी याच शाहशरीफ या संतांचे नाव आपल्या मुलांना ठेवले. शहाजीराजे
आणि शरीफजी राजे या दोन्ही मुलांना मालोजीराजांनी ती नावे ठेवली. ‘ तौ शाहशरीफ सिद्धनामांकिता उभौ ‘
अशी अगदी स्पष्ट नोंद परमानंदाने
शिवभारतात केलेली आहे.
जर शिवपूर्वकाळात , नजिक हे थोर मराठी
संतसाहित्यिक झाले नसते , तर मराठी भाषेचे ,
मराठी संस्कृतीचे , मराठी दैवतांचे आणि
मराठी आयडेन्टीटीचे केवढे मोठे नुकसान
झाले असते! हे संत समाजसुधारक होते. ते
लोकशिक्षक होते. त्यांना कोणत्याही
धनदौलतीची वा सत्ताधिकाराची अभिलाषा
नव्हती. एकदाच फक्त चिंचवडच्या
गणेशभक्त साधुमहाराजांनी
शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभारात जरा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न
केला. तेव्हा महाराजांनी त्यांना नम्रतेनेच पण स्पष्ट शब्दांत असे सुनावले , की पुन्हा तशी चूक
त्यांचे हातून घडली नाही.
कोणत्याही साधुसत्पुरुषाने महाराजांकडे
धनधान्याची मागणी केली नाही.
साधुसंत म्हणजे ईश्वराचे सर्वात जवळचे
नातलग. ते विरक्तच असतात. त्यावर
धंदा करतात , ते लबाड धामिर्क
दलाल. अशा दलालांना महाराजांनी जवळीक दिली
नाही. तशी संधीच कोणाला मिळाली नाही.
No comments:
Post a Comment