शिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती
जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’
संत वाङ्मयातील
ज्ञानेश्वरीचा वा श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचा सप्ताह चालावा किंवा
शौर्यदर्शी खेळांचा महोत्सव साजरा होत राहावा किंवा एखादा यज्ञ चालावा तशाच
प्रकारचा हा राज्याभिषेक सोहाळा रायगडावर चालू होता. आनंदाच्या डोही
आनंदाचे तरंग उमटत होते. अजि सोनियाचा दिनु ,
वषेर् अमृताचा घनु या वचनांची
साक्षात अनुभववृष्टी रायगड अनुभवित होता. यज्ञ करणारा यजमान राजा प्राचीन काळी
ज्या पद्धतीने आठ-दहा दिवस व्रतस्थ राहत असे ,
तसेच महाराज या सप्ताहात अहोरात्र
व्रतस्थ राहिले होते. खरं म्हणजे ,
त्यांचं सारं आयुष्यच व्रतस्थ होतं.
राज्याभिषेकाचे विधी दोन प्रकारचे.
प्रथम विधी अभिषेकाचा. त्यात पंचामृत आणि सर्व गंगोदके अन् समुदोदके यांनी
अभिषेक हा अभिषेक म्हणजेच राज्याभिषेक. हा विधी राजवाड्यात आतील
भागात , मोठ्या दालनात करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला
अष्टप्रधान , राजमंडळातील सरदार आणि राजकुटुंबाचे नातलग उपस्थित राहणार होते. सर्वसामान्य मंडळींना या कार्यक्रमात
स्थान अपेक्षित नव्हते. पण अभिषेकानंतर राऱ्यारोहण म्हणजेच सिंहासनारोहण हा
विधी तमाम उपस्थितांसाठी खुला राहणार होता.
पहाटे सुमारे तीन
वाजल्यापासूनच या सोहळ्यास प्रारंभ झाला. वार्धक्याने वाकलेल्या जिजाऊसाहेब
हा सर्वच सोहाळा पहात होत्या. इलियड या डच
प्रतिनिधीने म्हटले आहे की , राजाची वयोवृद्ध आई
एका जागी बसून हे सर्व पाहत होती.
महाराजांच्या महाराणी साहेबांच्या
आणि युवराजांच्या मस्तकावरून जेव्हा भारतातील सप्तगंगाच्या धारा
घळघळल्या असतील , तेव्हा महाराजांना काय वाटले असेल ? गंगेच यमुनेचैव
गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती.
फक्त गोदावरीचा जन्म त्र्यंबकेश्वरला होत होता. पण ही गंगा कशीबशी
नासिकपर्यंत येते न येते तोच पूर्व दिशेस तिला मोगलाई पारतंत्र्यात प्रवेश
करावा लागत होता. महाराजांच्या कानाशेजारून घळघळताना या गंगा राजाला
म्हणाल्या असतील का , ‘ राजा , तू आम्हाला माहेरी आणलंस रे! खूप आनंद झालाय. पण
आमचं सारं जीवन पारतंत्र्यात चाललंय रे! तू आम्हाला मुक्त कधी करणार! ‘
हे सारे विचार तुमचे
आमचे आहेत. हे खरंच आहे. म्हणजेच या देशाचेही आहेत हे ही खरंच ना! महाराजांनी
एकदा रावजी सोमनाथ पत्की या आपल्या अधिकाऱ्याशी बोलताना म्हटलं की , सिंधू नदीचे
उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो हा
आपला मुलुख पूर्ण स्वतंत्र करावा , अशीच माझी इच्छा आहे.
राज्याभिषेकाचा मंत्रतंत्रयुक्त
सोहळा पूर्ण झाला आणि महाराज , महाराणी अन् युवराज
वस्त्रालंकार धारण करून
राऱ्यारोहणाकरिता राजसभेकडे जाण्यास सिद्ध झाले. त्यांनी कुलदेवतांना
देवघरात नमस्कार केला. वडिलधाऱ्यांना आता नमस्कार करावयाचा. कोण कोण
आणि वडिलधारे ? बाजी पासलकर ? कान्होजी नाईक जेधे ?
सोनो विश्वनाथ डबीर ? आणखीन कोणी कोण ? पण ही सर्व वडिलधारी
मंडळी केव्हाच स्वर्गवासी झाली होती. होत्या पुण्यश्लोक जिजाऊसाहेब.
महाराजांनी त्यांना वंदन केले.
महाराज पहाटेच्या प्रकाशात
अन् मशालींच्या उजेडात राजसभेत सिंहासनापाशी आले. पूवेर्कडे तोंड करून
सिंहासनापाशी उभे राहिले. बरोब्बर समोर पूवेर्स दोन किल्ल्यांची शिखरे
दूरवर , निळ्या आकाशावर दिसत होती. एक होता राजगड. दुसरा होता तोरणा.
स्वराज्याचा अगदी प्रारंभ याच दोन
गडांच्या अंगाखांद्यावर महाराजांनी केला होता. आग्रा भेटीच्या
राजकारणापर्यंत महाराजांनी सगळी राजकायेर् ,
कारस्थाने आणि मोहिमा या राजगडावरूनच केली होती. राजगड शुभलक्षणी ठरला होता. बलाढ्य तर
होताच. पण राज्याभिषेक मान मिळत होता ,
रायगडाला राजधानीचा सन्मान लाथत होता , रायगडाला तो समोरचा
राजगड किंचितही हेवादावा न करता , महाराजांचा
रायगडावरचा सोहळा नगाऱ्यांच्या दणदणाटात
आणि तोफा बंदुकांच्या धडधडाटा , खळखळून जणू हसत बघत उभा होता. रायगड म्हणजे राजगडाचा भाऊच. मन
कसं भरतासारखं असावं. राजगडाचं तसंच होतं. पराक्रमाची शर्थ
करणाऱ्या असंख्य मावळ्यांना रायगडावरील राज्याभिषेकाला उपस्थित राहता आलं
नव्हतं. ते जमणारही नव्हतं. त्यांना आपापल्या जागीच गस्त पहारे करीत उभं
राहावं लागणार होतं. कोणीही नियम मोडून रायगडाकडे धावत नव्हता. अन् यातच या
मावळ्यांत असलेलं ‘ शिवाजीपण ‘ व्यक्त होत नव्हतं काय ?
विशाल मंदिर उभं राहणे हे
महत्त्वाचे कळस कुणी व्हायचे अन् मंदिराच्या पायात कायमचे कुणी राहायचे.
हा प्रश्ान् या मावळ्यांच्या दृष्टीने अगदी गौण. राष्ट्रनिमिर्ती याच
आराधनेतून होत असते.
महाराज उभे होते. त्यांच्या
उजव्या हाती सोन्याची विष्णुची छोटी मूतीर् होती. दुसऱ्या हाती धनुष्य
होते. वेदमंत्रघोष चालू होता. मुहूर्ताची घटका बुडाली आणि कुलोपाध्याय अन्
अध्वर्यू गागाभट्ट यांनी महाराजांना सिंहासनावर आरूढ होण्याची खूण केली.
ते आरूढ झाले आणि एकच जयघोष निनादला ,
‘ महाराज क्षत्रिय कुलावतांस
सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती की जय! ‘
प्रचंड आनंद कल्लोळ उसळला.
फुले , अक्षता , लाह्या बत्तासे ,
बिल्वदळे , तुलसीपत्रे
इत्यादींची मंगलवृष्टी सतत होत राहिली. वाद्ये आणि तोफा दणाणू लागल्या. कलावंत गाऊ नाचू लागले. चवऱ्या मोचेर्ले
सिंहासनाशेजारी झळाळू लागले. भगवे झेंडे आणि राजचिन्हे डोलू लागली. सार्वभौमत्त्वाचा
दिमाखात छत्र झगमगत होते. हा सोहळा पाहताना राजमाता जिजाऊसाहेबांना काय
वाटलं असेल , ते कोणच्या शब्दात सांगायचं ?
इथे सरस्वती आणि बृहस्पतीही अवाक्
होतात. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टाहास. आपल्याच एका मनाला
वाटतंय की , हा सोहाळा बघावयास प्रत्यक्ष शहाजीराजे महाराजसाहेब यावेळी हवे
होते. पण लगेच सावध होणारे दुसरे मन म्हणते ,
नाही रे वेड्या , जर शहाजीराजे यावेळी
असते , तर शिवाजीमहाराजांनी तीर्थरूप शहाजीराजांना आणि तीर्थरूप सकलसौभाग्यसंपन्न जिजाऊसाहेबांनाच हा राज्याभिषेक केला असता
अन् त्यांच्या मस्तकावर छत्र धरले असते. चवऱ्या मोचेर्ले ढाळले असते.
शहाजीराजे नव्हते , म्हणूनच तर महाराजांना स्वत:लाच छत्रपती व्हावं लागलं ना!
महाराज नंतर मिरवणुकीने हत्तीवरून
देवदर्शनास गेले. परतल्यावर त्यांनी
आऊसाहेबांना वंदन केले , अन् म्हणाले , ‘ आऊसाहेब ‘ हे सर्व तुमच्या आशीर्वादानेच प्राप्त जाहले! ‘
आणि सार्वभौम छत्रपती शिवाजीराजा
आईशेजारी बसला , आता त्याचे तेच एकमेव आराध्य दैवत उरले होते.
No comments:
Post a Comment